Karnataka Assembly : कर्नाटकमध्ये सध्या हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. सहकार मंत्री के.एन.राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना एक मोठा दावा केला होता. ‘एका केंद्रीय नेत्यासह जवळपास ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत’, असं के.एन.राजन्ना यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर कर्नाटकच्या विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला.
मुस्लिम आरक्षण विधेयक आणि हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यातच आज कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. तसेच कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला भाजपाने कायदेशीररित्या आव्हान देण्याचा निर्णय घेतला.
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला भाजपाने जोरदार विरोध करत विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भाजपाच्या काही आमदारांनी या विधेयकाची प्रत आणि काही कागदपत्रे थेट विधानसभेच्या अध्यक्षांवर भिरकावल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपा आमदारांच्या प्रचंड गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करण्यात आलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
#WATCH | Ruckus erupts in Karnataka Assembly as BJP MLAs enter the Well of the House and also tear and throw papers before the Speaker's chair
— ANI (@ANI) March 21, 2025
(Video source: Karnataka Assembly) pic.twitter.com/giejoDxCXF
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून भाजपा नेत्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये घुसून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच विरोधी आमदरांनी सभापतींच्या आसनापाशी जाऊन कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. भाजप आमदार भरत शेट्टी यांनी म्हटलं की,”हनी ट्रॅपच्या मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ४ टक्के मुस्लिम विधेयक मांडण्यात व्यस्त आहे. मात्र,आम्ही याचा निषेध केला आहे. आम्ही कोणालाही इजा केलेली नाही, असं भरत शेट्टी यांनी म्हटलं आहे.