पीटीआय, नवी दिल्ली
तिसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने मोदी सरकारवर मोठा हल्ला केला आहे. मतदानोत्तर चाचण्यांनंतर भांडवली बाजारांमध्ये झालेली मोठी वाढ आणि निकालानंतर गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान हा आजवरचा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या घोटाळ्यात थेट सहभागी आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.
शनिवारी अखेरच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. यातील बहुतांश अंदाजांमध्ये भाजप एकट्याच्या बळावर २७२चा जादुई आकडा पार करेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी भांडवली बाजारांमध्ये मोठी उसळी बघायला मिळाली. मात्र मंगळवारी प्रत्यक्ष निकालात भाजप बहुमतापासून दूर राहात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाजारांची अक्षरश: दाणादाण उडाली. गुरुवारी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश, प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकांना शेअर बाजारांत गुंतवणूक करण्याचा सल्ला का देत होते? हे त्यांचे काम आहे का. असे सवाल गांधी यांनी केले. भांडवली बाजारांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ‘सेबी’मार्फत चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या माध्यमाला दोघांनी दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. मोदी, शहा आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी गांधी यांनी केली. निकालानंतर झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटींचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा >>>चंदीगढ विमानतळावर महिला कर्मचाऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर कंगना रणौत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आतंकवाद…”
काँग्रेसचे हे आरोप भाजप नेते पियूष गोयल यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. पंतप्रधान मोदी हे देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी कष्ट घेत असताना राहुल गांधी घोटाळ्याचा बनाव रचून गुंतवणूकदारांना संभ्रमित करीत आहेत, असा प्रतिहल्ला गोयल यांनी चढविला. काँग्रेसच्या जागा वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरल्यामुळे भांडवली बाजार कोसळल्याचा दावाही त्यांनी केला.
नेमके काय घडले?
३१ मे : सेन्सेक्स ७३८८५.६० व निफ्टी २२४८८.६५ वर बंद.
१ जून : मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर
३ जून : भाजप सरकारच्या विजयाच्या अंदाजाने बाजाराची उसळी. सेन्सेक्सची अडीच हजारांची उसळी. निफ्टीतही तीन टक्क्यांची वाढ. सेन्सेक्स ७६४६८.७८ निफ्टी २३२६३.९०वर. गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत १३.७८ लाख कोटी रुपयांची भर.
४ जून : भाजप बहुमत गाठू शकत नसल्याचे कल दिसताच सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चार वर्षांतील सर्वांत मोठी सहा टक्क्यांहून अधिक पडझड. गुंतवणूकदारांची सुमारे ३१ लाख कोटींची मत्ता गमावली.
५ व ६ जून : भाजपप्रणीत ‘रालोआ’चे सरकारच्या शक्यतेने सेन्सेक्स-निफ्टीत सुधारणा. तीन टक्क्यांच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या मत्तेत २१ लाख कोटींची वाढ.
राहुल गांधी सांगत असलेले ३० लाख कोटी हे बाजारमूल्य प्रतीकात्मक आहे. त्यांना हे समजत नाही… मतदानोत्तर चाचण्यांवेळी विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली व भारतीय गुंतवणूकादारांनी विक्री केली. – पीयूष गोयल, भाजप नेते