Bihar Teenager Fake IPS: देशातील सर्वाधिक आयएएस, आयपीएस अधिकारी बिहार राज्यातून येतात, असं बोललं जातं. बिहारचे तरूण स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यानं यश मिळवत आले आहेत. मात्र काही जणांना परीक्षा न देता आयपीएस व्हायचं असतं. बिहारमध्ये एका १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने आयपीएस असल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून सर्व प्रकार समजून घेतला, तेव्हा त्यांनाही धक्क बसला. या तरुणानं आयपीएस होण्यासाठी तब्बल दोन लाख रुपये मोजले होते. त्यानंतर त्याला गणवेश आणि पिस्तूल मिळाली. तरुण गणवेश चढवून, कमरेला पिस्तूल लावून आईचा आशीर्वाद घेत घरातून बाहेर पडला. आता आपण लवकरच कर्तव्यावर रुजू होणार, असे स्वप्न पाहत असताना वाटेतच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

प्रकरण काय आहे?

फसवणुकीला बळी पडलेल्या १८ वर्षीय युवकाचं नाव मिथिलेश कुमार असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज सिंह नामक व्यक्तीनं त्याला आयपीएस बनविण्याचं स्वप्न दाखवून दोन लाख रुपये मागितले. दोन लाख रुपये दिल्यानंतर मिथिलेशला आयपीएसचा गणवेश आणि पिस्तूल देण्यात आली. आपण आयपीएस अधिकारी झालो, या थाटात मिथिलेश घरातून आईचे आशीर्वाद घेऊन आपल्या दुचाकीवरून निघाला. ही दुचाकीही दोन लाख रुपयांची आहे.

हे वाचा >> IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?

दरम्यान वाटेत सिकंदरा चौक नामक परिसरात काही कामानिमित्त मिथिलेश थांबला होता. त्याच्या सडपातळ अंगावरील पोलिसांचा गणवेश, कमरेला पिस्तूल पाहून अनेक लोक त्याच्या अवतीभोवती जमले. काहींना कुतूहल वाटलं, तर काहींना शंका आली. यातूनच काही लोकांनी सिकंदरा पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलीस ठाणे प्रमुख मिंटू कुमार सिंह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर मिथिलेश कुमार याची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी जेव्हा मिथिलेशची चौकशी केली तेव्हा त्यानं धक्कादायक माहिती दिली. आयपीएस अधिकाऱ्याची नोकरी मिळावी म्हणून त्यानं आपल्या मामाकडून दोन लाखांचं कर्ज काढलं आणि मनोज सिंहला पैसे दिले. मनोज सिंहने गणवेश शिवण्यासाठी मिथिलेशच्या शरीराचे माप घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या हातात गणवेश, बॅच आणि पिस्तूल दिली. गणवेश मिळाल्यानंतर मिथिलेशला तो खरंच आयपीएस झाल्याचं वाटलं. गणवेश घालून आईचा आशीर्वाद घेऊन तो मनोज सिंहला भेटायला जात होता. उरलेले पैसे देऊन पुढील माहिती त्याला घ्यायची होती. मात्र तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

हे ही वाचा >> Success Story: झोपडीत राहिले, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला; अनेक अडथळ्यांवर मात करून झाले डीएसपी

चौकशीदरम्यान मिथिलेशने सांगितले की, मनोज सिंहने आयपीएसची नोकरी देण्याच्या बदल्यात दोन लाख रुपये मागितले. मी त्याला पैसे दिले. तसेच उरलेले पैसे देण्यासाठीच मी चाललो होतो. त्यानंच मला गणवेश घालून भेटायला बोलावलं होतं.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान ही बातमी देशभरात व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर मिथिलेशचा जबाब आणि त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे फक्त बिहारमध्येच घडू शकतं अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.