बिहारमध्ये गोमांसची वाहतूक केल्याच्या संशयातून स्वयंघोषित गोरक्षकांनी तीन जणांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. मारहाण केल्यानंतर गोरक्षकांनी तिघांना पोलिसांच्या ताब्यात सोपवले असून विरोधकांनी यावरुन नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
भोजपूर जिल्ह्यात एका ट्रकमधून गोमांसची वाहतूक होत असल्याचा संशय गोरक्षकांना आला. त्यांनी ट्रकला अडवून तपासणी केली. स्वयंघोषित गोरक्षकांनी ट्रकमधील तीन जणांना मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘राणी सागर परिसरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यामधून हे मांस नेले जात असावे, याप्रकरणाशी संबंधीत व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल’ असे जिल्हाधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले. ट्रकमधून जप्त केलेले मांस हे गोमांस आहे का याची तपासणी करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.
ट्रकमध्ये गोमांस असल्याचे वृत्त भोजपूर जिल्ह्यात वेगाने पसरले. आरा आणि बक्सर या भागात नागरिकांनी रास्ता रोको करत घटनेचा निषेध दर्शवला. जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच शाहपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
बिहारमधील या हिंसाचावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले. कम्यूनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी जदयू- भाजप सरकारवर निशाणा साधला. ‘बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले’ असा टोला त्यांनी लगावला. ‘बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री असताना आता फक्त हिंदूत्वाची अंमलबजावणी होईल. भाजपची सत्ता येताच बिहारमध्ये गोरक्षकांचा हिंसाचार आणि जमावाकडून मारहाणीच्या घटना सुरु झाल्या’ असे त्यांनी नमूद केले.