भारतीय सेनेतील कारकुन पदासाठीच्या लेखी परीक्षेस बसलेल्या जवळजवळ ११५० उमेदवारांनी केवळ अंडरवेअर घालून परीक्षा दिल्याची घटना बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये घडली. परीक्षेदरम्यान कॉपी टाळण्यासाठी एका मोठ्या मैदानावर हातात पेन आणि प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षार्थींना केवळ अंडरवेअर घालून परीक्षेस बसण्याचे आदेश देण्यात आल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. याबाबत सेनेच्या प्रदेश अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता,  परिक्षार्थीने जवळ कॉपी बाळगली आहे का हे तपासण्यात वाया जाणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी उमेदवारांना कपडे काढण्यास सांगण्यात आल्याची माहिती त्याने दिली.
परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक उमेदवाराची तपासणी करण्यात खर्च होणारा वेळ टाळण्यासाठी सदर पाऊल उचलल्याचे कर्नल वीएस गोधरा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मैदानावर पोहोचताच आम्हाला अंडरवेअर व्यतिरिक्त सर्व कपडे उतरविण्यास सांगण्यात आले. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने इच्छा नसतादेखील आम्हाला त्या आदेशाचे पालन करावे लागले. तसेच परीक्षेदरम्यान दोन परीक्षार्थींमध्ये आठ फूटाचे अंतर ठेवण्यात आले होते, अशी माहिती एका उमेदवाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
असा काही प्रसंग ओढावेल याची अपेक्षादेखील नसल्याचे सांगत परीक्षेस आलेल्या अन्य एका उमेदवाराने हा सर्व प्रकार अतिशय लज्जास्पद होता अशी प्रतिक्रिया दिली. सेनेने दुसऱ्यांदा अशाप्रकारे परीक्षा घेतल्याचे काही लोकांनी सांगितल्याचेदेखील तो म्हणाला. बिहारमध्ये परीक्षा असल्यामुळे सेनेने असे पाऊल उचलले का असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांनी त्यास नकार देत राज्याशी याचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला.
केवळ शारीरिक आणि मेडिकल पडताळणीच्या वेळी उमेदवारांना कपडे उतरविण्यास सांगण्यात येते. परंतु, लेखी परीक्षा ही मानसिक योग्यता तपासण्यासाठी घेण्यात येत असल्याने ही पद्धत चुकीची असल्याचे मत सेनेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.