संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. अपेक्षेप्रमाणे या निवडणुका पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. १२, १६, २८ आक्टोबर आणि १, ५ नोव्हेंबर या पाच दिवशी मतदान होणार असून, मतमोजणी ८ नोव्हेंबर रोजी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आजपासूनच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
बिहारमधील एकूण २४३ जागांसाठी ही निवडणूक होते आहे. पहिल्या टप्प्यात ४९, दुसऱया टप्प्यात ३२, तिसऱया टप्प्यात ५५, चौथ्या टप्प्यात ५० आणि पाचव्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदान होईल. मुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे झैदी यांनी सांगितले. एकाच नावाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर उमेदवारांचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाच्या तुकड्या बिहारमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. बिहारमधील एकूण ६.६८ कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ३६ मतदान केंद्रांवर मतदारांना मतदान केल्याची पोचपावतीही मिळणार आहे. मतदानाच्या काळात एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली असल्याचेही झैदी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा