दारू अर्थव्यवस्थेला शक्ती देते की नाही, दारूविक्री फक्त काही दुकानांमध्येच व्हायला हवी की सुपर मार्केटमध्येही व्हावी, दारूबंदी असावी की नाही या मुद्द्यांवर नेहमीच चर्चा होत असते. दारूला वरवर बराच विरोध असला, तरी पुन्हा दुसऱ्या वाटेनं दारूचं समर्थन देखील होताना दिसत असतं. पण तरी देखील काही ठिकाणं अशी आहेत, जिथे दारू किंवा दारू पिऊन येणाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो. राज्याचं विधानभवन हे अशाच काही ठिकाणांपैकी एक. जिथे दारूला प्रवेशच नाही, अशा ठिकाणी दारुच्या बाटल्या सापडल्या तर तिथल्या प्रशासाची सर्वात आधी नाचक्की होते. म्हणूनच प्रशासन अशा ठिकाणी सतर्क असतं. असाच काहीसा प्रकार बिहारमधून समोर आला आहे.
बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या आवारात चक्क दारुच्या बाटल्या सापडल्या होत्या. खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच चेंबरपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दारूची बाटली सापडली होती. या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर प्रशासकीय चौकशी सुरू झाली. यानंतर खुद्द बिहारचे मुख्य सचिव आणि डीजीपी विधानभवनाच्या आवारात दारुच्या बाटल्या शोधताना दिसले होते. याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
दारूची बाटली सापडली, तर पोलीस जबाबदार!
यानंतर पुन्हा असा काही प्रकार घडू नये, यासाठी पाटण्याचं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन देखील चांगलंच सतर्क झालं आहे. पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह आणि एसएसपी एम. एस. धिल्लाँ यांनी बुधवारी बिहार विधानसभेच्या संपूर्ण परिसराची छाननी केली. यावेळी पोलिसांना विधानभवनाचा पूर्ण परिसर तपासून कुठे दारूची बाटली तर नाही ना, याची खातरजमा करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.
“आम्ही विधानभवनातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य किंवा दारूच्या बाटल्या आढळल्यास तातडीने पोलिसांना सतर्क करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, विधान भवन परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरलं जाईल”, असं डीजीपी धिल्लाँ यांनी स्पष्ट केलं आहे.