महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिहार व उत्तर प्रदेशातून आलेल्या विद्यार्थी व पालकांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेचे पडसाद बिहार विधानसभेत उमटले असून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
सर्वच पक्षांच्या सदस्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले, की मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी या घटनेबाबत महाराष्ट्र सरकारला विचारणा करावी. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मनसेप्रमुख राज ठाकरे हे अशा लोकशाहीबाहय़ मार्गाचा अवलंब करीत आहेत. भाजपचे संजय सिंग यांनी शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला त्या वेळी सत्ताधारी व विरोधी सदस्य जागेवर उभे राहिले व हा प्रश्न महाराष्ट्र सरकारकडे उपस्थित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अब्दुल बारी सिद्दिकी यांनी सांगितले, की सरकारने या घटनेची सविस्तर माहिती सादर करावी. राजद सदस्यांनीही निषेधात भाग घेतला. या प्रश्नावर सरकारला जरूर चिंता आहे, पण सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित न केल्याने नियमाप्रमाणे त्यावर चर्चा करता येत नाही, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. काँग्रेस सदस्यांनी अशी मागणी केली, की हा प्रश्न शून्य प्रहरात उपस्थित करावा.
सातारा सरकारी रुग्णालयात सोमवारी सहावीच्या प्रवेशासाठी मुलांची वैद्यकीय चाचणी घेतली जात असताना मनसे कार्यकर्ते तेथे आले व बिहार, उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वयाचे खोटे पुरावे दाखल केले आहेत असे सांगून पालक व विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा