एनडीएशी काडीमोड घेऊन संयुक्त जनता दलाने विश्वासघात केल्याचा आरोप करीत भाजपने पुकारलेल्या बिहार बंदला मंगळवारी हिंसक वळण लागले. बंददरम्यान भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले.
एनडीएतून बाहेर पडलेल्या जेडीयूवर विश्वासघाताचा आरोप भाजपने केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर बिहार बंदची हाक देत विश्वासघात दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेडीयूचे नेते राजीव रंजन यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन बंदला विरोध केला.
यावेळी भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची हाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन्हीकडचे कार्यकर्ते जखमी झाले.
बंदच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सीपी ठाकूर, सुशील कुमार मोदी, राजीव प्रताप रुड्डी आणि सईद शहानवाझ हुसैन आदींना डाक बंगलो चौक येथे ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी दुकाने, कार्यालये, बाजारपेठा बंद पाडल्या. दरभंगा, नालंदा आदी भागातील रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती.
भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबाद, पूर्णिया, मुझफ्फरपूर आणि इतर जिल्ह्य़ांमध्येही रास्तारोको केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
भाजप नेते शहानवाझ हुसेन यांनी भाजपचा बंद यशस्वी झाल्याचे सांगितले. आणीबाणीनंतरचा हा सर्वात मोठा बंद ठरला असून, नितीश कुमार सरकारची अधोगती सुरू झाल्याची टीका त्यांनी केली.

नितीश यांच्याकडून पंतप्रधानांचे आभा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे धर्मनिरपेक्ष नेता असल्याचे प्रशस्तीपत्रक पं्रतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्यानंतर आनंदित झालेल्या नितीश कुमार यांनी याप्रकरणी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
देशाच्या पंतप्रधानांनी मला धर्मनिरपेक्ष म्हटले असून ते सत्य आहे. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याबद्दल विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

लोकजनशक्ती पक्षाचा जेडीयूला पाठिंबा
भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सरसावलेल्या संयुक्त जनता दलाला लोकजनशक्ती पक्षाच्या आमदाराने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जेडीयूच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले.
अरारिया मतदारसंघाचे आ. जकिर हुसैन खान यांनी स्पष्ट केले की, बुधवारच्या बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, तेव्हा भाजपसारख्या धार्मिक पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा आपण नितीश कुमार सरकारला मत देऊ. याबाबत पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनाही आपली भूमिका कळवल्याचे खान यांनी सांगितले.

जेडीयूविरोधात राजद मतदान करणार
एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय जेडीयूने घेतल्यानतंर बिहारमधील सरकारमधून भाजपनेही पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी संख्येची जुळवाजुळव करणाऱ्या जेडीयूविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली.

जेडीयूला चार आमदारांची गरज
बिहार विधानसभेत २४३ सदस्य आहेत. यामध्ये संयुक्त जनता दल ११८, भाजप ९१, एलजेपी १, राजद २२, कॉंग्रेस चार, सीपीआय १ तर ६ अपक्ष आमदार आहेत.  संयुक्त जनता दलाला सरकार सुरक्षित करण्यासाठी अद्याप चार आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यातच सहापैकी चार अपक्ष आमदारांनी जेडीयूला पाठिंब्याचे आश्वासन दिले .

Story img Loader