एनडीएशी काडीमोड घेऊन संयुक्त जनता दलाने विश्वासघात केल्याचा आरोप करीत भाजपने पुकारलेल्या बिहार बंदला मंगळवारी हिंसक वळण लागले. बंददरम्यान भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले.
एनडीएतून बाहेर पडलेल्या जेडीयूवर विश्वासघाताचा आरोप भाजपने केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर बिहार बंदची हाक देत विश्वासघात दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेडीयूचे नेते राजीव रंजन यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन बंदला विरोध केला.
यावेळी भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची हाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन्हीकडचे कार्यकर्ते जखमी झाले.
बंदच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सीपी ठाकूर, सुशील कुमार मोदी, राजीव प्रताप रुड्डी आणि सईद शहानवाझ हुसैन आदींना डाक बंगलो चौक येथे ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी दुकाने, कार्यालये, बाजारपेठा बंद पाडल्या. दरभंगा, नालंदा आदी भागातील रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती.
भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबाद, पूर्णिया, मुझफ्फरपूर आणि इतर जिल्ह्य़ांमध्येही रास्तारोको केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
भाजप नेते शहानवाझ हुसेन यांनी भाजपचा बंद यशस्वी झाल्याचे सांगितले. आणीबाणीनंतरचा हा सर्वात मोठा बंद ठरला असून, नितीश कुमार सरकारची अधोगती सुरू झाल्याची टीका त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा