बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील बिसफी येथील भाजपा आमदार हरीभूषण ठाकूर यांनी शुक्रवारी एक वादग्रस्त विधान केलं. मुस्लिमांचा मतदानाचा हक्का काढून घेतला पाहिजे असं ठाकूर यांनी म्हटलंय. या वक्तव्यानंतर बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवलं आहे.
बिहारमध्ये भाजपासोबत सत्तेत असणाऱ्या जनता दल युनायटेडने यावर तातडीने प्रतिक्रिया देत या वक्तव्याचा निषेध केलाय. पक्षाचे प्रवक्ते निरज कुमार यांनी ठाकूर यांचं वक्तव्य हे ‘निंदनीय आणि दाहक’ आहे असं म्हटलंय. यापूर्वीही ठाकूर यांनी अशापद्दतीचं वक्तव्य केलं होतं.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकूर यांनी, “१९४७ च्या फाळणीमध्ये आपण मुस्लिमांना वेगळा देश दिला. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जायला पाहिजे, आणि जर त्यांना भारतात रहायचं असेल तर त्यांनी दुय्यम दर्जाचं नागरिक म्हणून राहिलं पाहिजे. आम्ही सरकारला विनंती करतोय की मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा,” असं म्हटलं होतं.
मुस्लीम एका अजेंड्यानुसार काम करतात असा आरोप ठाकूर यांनी केलाय. या अजेंड्यानुसार भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा विचार आहे, असंही ठाकूर म्हणाले. यापूर्वीही ठाकूर यांनी अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहे. यापूर्वी त्यांनी बिहार विधानसभेच्या सभापतींनी वंदे मातरम न म्हणणाऱ्या मुस्लीम आमदारांवर कारवाईची मागणी केलेली. “राष्ट्रगीत असतं कशासाठी? ते धरतीची, फुलांची आणि पाण्याचं गुणगाण गाण्यासाठी असते. (वंदे मातरम गाणार नसतील तर) ते (मुस्लीम) पाणी पिणं थांबवणार आहेत का?” असंही ठाकूर म्हणालेल.
“ठाकूर यांना भारतीय नागरिकत्वाचं ज्ञान नसल्याचं दिसतंय. भारतात राहणाऱ्या नागरिकांच्या नागरिकत्वाबद्दल निर्णय घेणारे ते कोण आहेत? त्यांना फक्त प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे,” अशा शब्दांमध्ये जेडीयूच्या प्रवक्त्यांनी ठाकूर यांच्यावर निशाणा साधलाय.