संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांच्या INDIA या आघाडीनं संसदेत सत्ताधारी एनडीए व विशेषत: भाजपाविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी विरोधी पक्षांचे खासदार सरकारचा निषेध करण्यासाठी चक्क काळे कपडे घालून संसदेच्या कामकाजात सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याच एका नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मणिपूरची घटना आणि संतप्त प्रतिक्रिया
मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात देशभर व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या या व्हिडीओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. मात्र, घटनेच्या दोन महिन्यांनंतर मोदी त्यावर व्यक्त झाले, त्यातही संसदेत न बोलता फक्त माध्यमांसमोर त्यांनी भूमिका मांडल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला आहे.
मणिपूरमध्ये अंतर्गत सामाजिक असंतोषामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच खुद्द भाजपाच्या एका नेत्यानं मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या अयोग्य हाताळणीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला आहे.
“बिरेन सिंह यांना हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही”
भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. “मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा यांनी दिली आहे.
“हा आपला सनातन धर्म आहे का?”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच विनोद शर्मा यांनी आपल्या पक्षालाही लक्ष्य केलं आहे. “भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे”, असं विनोद शर्मा म्हणाले.
मणिपूर धिंडप्रकरणी सीबीआय तपास; चित्रफीत तयार करणाऱ्या संशयिताला अटक
काय घडलं मणिपूरमध्ये?
३ मे रोजी मणिपूरमध्ये हिंसक घटनांना सुरुवात झाली. ऑल ट्रायबल स्टुडेंट्स युनियन ऑफ मणिपूरनं ३ मे रोजी एक मोर्चा काढला होता. यात मैतेई समाजाला अनुसूचित जमातींच्या यादीत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे मणिपूरमध्ये सामाजिक संघर्ष निर्माण झाला. महिलांची नग्न धिंड काढण्याचा अश्लाघ्य प्रकार ४ मे रोजी घडला. मात्र, त्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. ३ मे पासून आजतागायत मणिपूरमध्ये प्रचंड तणाव असल्याचं दिसत आहे.