बिहारमधील १२ वीच्या परीक्षेतील ‘टॉपर’ गणेश कुमारला पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. गणेश कुमारचा निकाल बिहार बोर्डाने रद्द केला होता. गणेश कुमारला संगीत विषयातील प्रॅक्टिकलमध्ये मिळालेल्या गुणांवरुन संशय व्यक्त करण्यात आला होता.

बिहार शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या परीक्षेत कला शाखेत गणेश कुमार हा गुणवत्ता यादीत झळकला होता. गणेश कुमारला संगीत विषयाच्या प्रॅक्टिकलमध्ये ७० पैकी ६५ गूण मिळाले होते. तर लेखी परीक्षेत ३० पैकी १८ गूण मिळाले होते. याशिवाय हिंदी विषयात त्याला १०० पैकी ९२ गूण मिळाले होते.

गुणवत्ता यादीत झळकलेल्या गणेश कुमारची प्रसारमाध्यमांनी मुलाखत घेतली होती. यामध्ये गणेश कुमारला संगीत आणि हिंदीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण त्याचे उत्तर देताना गणेश कुमारची दमछाक झाली होती. मुलाखतीत त्याने गाणेही गायले होते. या मुलाखतीतून गणेश कुमारची पोलखोल झाली होती. प्रसारमाध्यमांमधून गणेश कुमारच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच बिहारचे शिक्षण मंत्री अशोक चौधरी आणि बिहार बोर्डाचे आनंद किशोर यांनी गणेश कुमारच्या निकालाला क्लीनचिट दिली होती.शुक्रवारी संध्याकाळी बिहार बोर्डाने यूटर्न घेत गणेश कुमारचा निकाल रद्द केला आहे. याशिवाय त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गेल्या वर्षी ‘टॉपर्स घोटाळ्या’मुळे नाचक्की झालेल्या बिहार बोर्डात सलग दुसऱ्या वर्षीही घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वर्षी बिहार बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण कमी असतानाही गणेश कुमारला अटक झाल्याने परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader