BPSC Exam Row: बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राजधानी पाटणा येथे रविवारी आंदोलन केले. मात्र बिहार लोकसेवा आयोगाने फक्त एका परीक्षा केंद्रावरील परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोरही सामील झाले होते. विद्यार्थ्यांच्या वतीने ते प्रशासनाशी संवादही साधत होते. मात्र रात्री त्यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला, त्यानंतर विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज करण्यात आला. आता विद्यार्थी प्रशांत किशोर यांच्यावर आरोप करत असून त्यांनी विद्यार्थ्यांना अर्ध्यात सोडून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ विरोधक आज नितीश कुमार सरकारविरोधात आंदोलन करणार असून सोमवारी (३० डिसेबंर) बिहार बंद आणि धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी प्रशांत किशोर यांना फटकारले. “आमच्या आंदोलनाचे राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. प्रशांत किशोर म्हणाले होते की, आंदोलनात मी पुढे राहिल. मात्र त्यांनी मधूनच पळ काढला. आम्हाला राजकारणाचा शिकार व्हायचे नाही. आम्हाला फक्त फेरपरीक्षा हवी आहे.”

दरम्यान बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रशांत किशोर यांच्यावर जोरदार टीका केली. प्रशांत किशोर यांनी आंदोलन स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बिहार लोकसेवा आयोगाच्या विषयावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही. सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळ करत असून लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा रद्द व्हायलाच हवी.

विद्यार्थ्यांची मागणी काय?

बिहार लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ डिसेंबर रोजी पार पडली. या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडला असा आरोप झाल्यानंतर ज्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला, त्या परीक्षा केंद्रावरच पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. या केंद्रावर जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र विद्यार्थी संपूर्ण राज्यात पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करत आहेत.

म्हणून आम्ही लाठीचार्ज केला – पोलीस

पाटणा शहराच्या पोलीस अधीक्षक स्वीटी सेहरावत यांनी एएनआयशी बातचीत करताना लाठीचार्ज करण्याचे कारण सांगितले. तसेच ज्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी जमवले होते, ते विद्यार्थ्यांना सोडून पळाले, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar bpsc exam row patna students protester slams prashant kishore to left protest before lathi charge kvg