बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अरारिया जिल्ह्यातील हा पूल उद्घाटनाआधीच कोसळल्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच ब्रिज कोसळण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अररिया जिल्ह्यातील सिकटी येथे बकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला गेला होता. मात्र पहिल्याच पावसात पूल नदीमध्ये सामावला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी कंत्राटदारांवर आरोप केला आहे. बांधकामात बोगस साहित्य वापरल्यामुळेच पूल पडला असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पूल पडताना स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला पूलाचा काही भाग कोसळला. यावेळी लहान मुले हा व्हिडीओ टिपण्यासाठी पळत पूलाजवळ जात असताना पुलाचा उर्वरित भागही कोसळला. व्हिडीओत दिसत असल्यामुळे पुलाच्या मध्यभागी असलेला खांब शाबूत राहिला आहे. उर्वरित सर्व पूल नदीत बुडाला.

भाजपाचे स्थानिक आमदार विजय कुमार मंडल आणि खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी हा पूल बांधण्यासाठी प्रयत्न केले होते. सुरुवातीला पुलाचे बांधकाम केल्यानंतर नदीच्या किनाऱ्यापासून दूर राहिल्यामुळे १२ कोटी रुपये खर्च करून तो नदीच्या किनाऱ्याला जोडण्यात आला. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुलाच्या बांधकामाकडे लक्ष दिले नाही, तसेच कंत्राटदारांनी कुचराई केल्यामुळे पुलाचे उदघाटन करण्याआधीच त्याला जलसमाधी मिळाली.

बिहारमध्ये पूल कोसळण्याची घटना नवी नाही. याआधीदेखील काही वेळा पूल कोसळले असून त्याखाली अनेकांना जीव गमवावा लागला होता. काही दिवसांपूर्वीच भागलपूर येथे पूल कोसळला होता. यानंतर सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला होता. भागलपूर आणि खगरीया यांन जोडणारा निर्माणाधीन पूल दोन वेळा कोसळला होता. ३० एप्रिल २०२३ रोजी पहिल्यांदा हा पूल कोसळला होता. त्यानंतर ४ जून रोजी तो पुन्हा एकदा कोसळला. या घटनेमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भूमिका मांडावी लागली होती.

Story img Loader