बिहारमधील पूल दुर्घटनेप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर ऐकून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जोराचा वारा आल्यानेच बांधकामाधीन असलेल्या या रस्त्यावरील पुलाचा काही भाग कोसळला असं या अधिकाऱ्याने नितीन गडकरी यांना सांगितलं होतं. २९ एप्रिलला बिहारमधील सुलतानगंज येथील काम सुरु असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सेक्रेटरीला या दुर्घटनेची कारण विचारली. यावर त्याने मला जोराचा वारा सुटला असल्याने पूल कोसळला असं उत्तर दिलं”. आयएएस अधिकाऱ्याचं हे उत्तर ऐकून नितीन गडकरींना आश्चर्याचा धक्काच बसला. एक आयएएस अधिकारी असं उत्तर कसं काय देऊ शकतो असं गडकरी यावेळी म्हणाले.
“मला एक समजत नाही हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच,” असं नेहमी आपली परखड मतं मांडणाऱ्या गडकरींनी सांगितलं. नितीन गडकरी यांनी यावेळी दर्जेशी तडजोड न करता पुलाच्या कामाचा खर्च कमी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
सुलतानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी याआधी मुख्यमंत्र्यांनी पूल दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली होती. १७१० कोटींचा खर्च करुन उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करु शकत नसेल तर हा चौकशीचा विषय असल्याचं गडकरी म्हणाले.
३११६ मीटर लांब असलेल्या या पुलाचं काम २०१४ मध्ये सुरु झालं होतं. २०१९ मध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही हे काम सुरु आहे.