बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर विरोधकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली. तसेच हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारं असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर सडकून टीका झाल्यानंतर आता नितीश कुमार यांनी माफी मागितली. ते बुधवारी (८ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.
नितीश कुमार म्हणाले, “माझ्या वक्तव्यावर प्रचंड टीका होत आहे. मी जर काही चुकीचं बोललो असेल, तर मी माफी मागतो. मी माझं वक्तव्य मागे घेतो. माझ्यावर टीका करणाऱ्यांचं मी स्वागत करतो.”
नितीश कुमार काय म्हणाले होते?
नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत वादग्रस्त टिप्पणी केली. यामुळे महिला आमदार खाजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये खसखस पिकली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आता टीकेची झोड उठवली. नितीश कुमार यांनी विविध विभागांच्या आर्थिक परिस्थितीचा तपशील देणारा जात सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल राज्याने प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी हे अश्लील वक्तव्य केलं.
हेही वाचा : लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना नितीश कुमारांची जीभ घसरली, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विरोधकांकडून हल्लाबोल
नितीश कुमार म्हणाले होते, “मुलगी शिकली, तिने लग्न केलं की, पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो.”