Nitish Kumar Mobile Comment: गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच विधानसभेत बोलताना दावा केला की, मोबाइल फोनच्या वापरामुळे १० वर्षांत पृथ्वीचा नाश होईल.
नितीश कुमार यांच्या या दाव्यानंतर एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले असून, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या विधानावर टीका करत ते “रूढीवादी आणि तंत्रज्ञानविरोधी” असल्याचे म्हटले आहे.
मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे पुढील १० वर्षांत पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येईल, असा दावा केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात चर्चेत आले आहेत. बिहार विधानसभेच्या आवारातील मोबाइल फोनवरील बंदीबाबत चर्चा करताना कुमार म्हणाले की, जर या उपकरणांचा वापर असाच सुरू राहिला तर पुढील दशकात जग संपेल.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, कुमार कृष्ण मोहन उर्फ सुदय यादव यांना पीडीएस डीलर्सबद्दल प्रश्न विचारताना मोबाइल फोन वापरत होते. हे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहाला आठवण करून दिली की विधानसभेत मोबाईल फोनच्या वापरावर आधीच बंदी आहे.
सभागृहाबाहेर हाकलून लावा
यावर नितीश कुमार यांनी सभापती नंद किशोर यादव यांच्याकडे आक्षेप नोंदवला आणि म्हटले की, “सभागृहात मोबाइल फोनवर बंदी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जो कोणी, विधानसभेत मोबाइल फोन घेऊन येईल त्याला सभागृहाबाहेर हाकलून लावावे.”
पुढील १० वर्षांत जग संपेल
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोबाइल फोनच्या अतिवापराच्या नकारात्मक परिणामांबद्दल इशारा दिला. ते म्हणाले “पूर्वी, मी खूप मोबाइल वापरत होतो. मला लक्षात आले की पुढे याचा त्रास होईल, म्हणून मी २०१९ मध्ये याचा अतिवापर थांबवला. जर हे असेच चालू राहिले तर पुढील १० वर्षांत जग संपेल,” असा दावा नितीश कुमार यांनी केला.
कॉम्प्युटर निरक्षर मुख्यमंत्री
दरम्यान बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचे हे वक्तव्य खोडून काढले आहे. त्यांनी नितीश कुमारांच्या धाडसी दाव्यावर टीका करताना म्हटले की, “बिहारमध्ये असा “कॉम्प्युटर निरक्षर मुख्यमंत्री” असणे दुर्दैवी आहे.”