पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपा जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप करत नितीश कुमारांनी युती तोडली. त्यानंतर नितीश कुमारांनी राजदसमवेत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून नितीश कुमार सातत्याने भाजपावर टीकास्त्र सोडत आहे. आताही त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. २०१७ साली एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो मुर्खपणाचा होता. भविष्यात भाजपाशी कोणतीही युती करणार नाही, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
जनता दलच्या ( युनायटेड ) राष्ट्रीय परिषदेत नितीश कुमार बोलत होते. “भाजपाच्या नेत्यांनी माझं ऐकलं नाही. मात्र, नाईलाजास्तव आम्हाला एनडीएसोबत रहावे लागलं. एनडीएच्या आघाडीत असून सुद्धा जेडीयूला डावलण्यासाठी भाजपाने उपाययोजना केल्या होत्या. पण, आता विरोधी पक्षाने त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आलं पाहिजे,” असं आवाहन नितीश कुमार यांनी केलं आहे.
“बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाकारला”
“पुर्वेकडील राज्यांनी विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली पाहिजे. जेडीयू कित्येक वर्ष एनडीएसमवेत होता. मात्र, तरीही केंद्र सरकारने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नाकारली,” असा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे.
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग
भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशात ‘अघोषित आणीबाणी’ निर्माण झाली आहे. देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला, असा आरोप देखील जेडीयूच्या बैठकीत करण्यात आला.
नितीश कुमार घेणार विरोधी पक्षातील नेत्यांची भेटीगाठी
नितीश कुमार विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत माहिती देताना जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी म्हटलं, “नितीश कुमार सोमवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येंच्युरी आणि विरोधी पक्षांच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी करण्याची शक्यता आहे. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही नितीश कुमार भेट घेणार आहेत,” असे त्यागी यांनी सांगितलं.