रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणावरून अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या घरी छापेमारी केली. तसेच, देशातील लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाशी संबंधित २४ ठिकाणांवर ईडीने धाड टाकली होती. यात काही रक्कम, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन ईडीने जप्त केलं होतं. याप्रकरणावर आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाष्य करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “सरकार बनल्यानंतरही छापे पडले होते. घटनाक्रम समजून घ्या. अमित शाह घटनाक्रम समजून सांगतात. जेव्हा सरकार बनलं आणि विश्वासदर्शक ठराव मांडला जात होता, तेव्हाही छापे पडले. त्या छाप्यांचं काय झालं? किती मिळाले १०० कोटी, १ हजार कोटी.”
हेही वाचा : अदाणी समूहानं तब्बल २.१५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची केली मुदतपूर्व परतफेड; ३१ मार्चची देण्यात आली होती मुदत!
“२०१७ साली आमच्या कुटुंबाजवळ १ हजार कोटी रूपयांची संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला. त्याप्रकरणात आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयने तपास केला. आज २०२३ साल आहे. मागील सहा वर्षात या संपत्तीचं काय झालं?”, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.
“भाजपाने आपला लेखक बदलला पाहिजे. कारण, सातत्याने एकच वक्तव्य करण्यात येतं. ते ठीक वाटत नाही. आता, ६०० कोटी रूपयांची रक्कम तेजस्वी यादव यांच्या घरी मिळाली सांगतात. मी म्हणतो ठेंगा मिळाला आहे,” असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावरही तेजस्वी यादव यांनी टीकास्र सोडलं आहे. “तपास यंत्रणांनी २४ ठिकाणी छापेमारी केली. या ठिकाणी तपास यंत्रणांना जेवढी रक्कम मिळाली नाही, तेवढी बेहिशोबी रक्कम गिरिराज सिंह यांच्या घरी मिळाली होती. कर्नाटकातील भाजपा आमदाराच्या घरी ८ कोटी सापडले. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी तिथे गेली का? नाही ना?,” असेही तेजस्वी यादव यांनी म्हटलं.