भाजपामुक्त भारत करण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २३ जून रोजी पाटण्यात विरोधकांची बैठक होणार आहे. यामध्ये देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार असून सरकारविरोधातील एक्याचं दर्शन घडवणार आहेत. दरम्यान, ही बैठक मोदींविरोधातील बैठक असणार असल्याची टीका केली जातेय. यावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही जेव्हापासून एकत्र आलो आहोत, आमची महाआघाडी झाली आहे तेव्हापासून आम्ही जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारच्या बैठकीत सगळे येणार आहेत आणि त्यांची मते मांडणार आहेत. येथे कुणी मोदींविषयी बोलत नाही, मुद्द्यांविषयी बोलत आहे”, असं तेजस्वी यादव म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“सगळ्यांना माहितेय की मुद्दा काय आहे? त्यामुळे प्रत्येकजण आपली भूमिका ठेवेल. प्रशासन, सामाजिक आणि सरकार चालवण्यासाठी लागणारे अनुभव मोदींपेक्षा विरोधी पक्षात जास्त आहेत. विरोधी पक्षात मोदींपेक्षा जास्त अनुभवी लोक आहेत. विरोधी पक्षातील नेते मीडियाद्वारे निर्मित केलेले नाहीत. विरोधी पक्षातील नेते हे जनतेसोबत संवाद करतात”, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
“आम्हाला वाटतं की ही बैठक महत्त्वाची ठरेल. प्रत्येकजण आपली भूमिक मांडतील. निवडणूक व्यक्तीसापेक्ष नसते. निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे. गरिबी, बेरोजगारी, महागाईमुळे लोक ग्रासले आहेत. देशाला वाटतं की या मुद्द्यांवरून निवडणुका झाल्या पाहिजेत, असंही ते पुढे म्हणाले.
उद्या विरोधकांची पाटण्यात बैठक
भाजपाविरोधात एक्य दाखवण्याकरता गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आपचे अरविंद केजरीवाल, बिहारचे नितिश कुमार, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी सातत्याने देशातील इतर विरोधी पक्षातील वरिष्ठांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. महाराष्ट्रातही यातील अनेक नेत्यांनी भेट देत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. तसंच, शरद पवारांनीही या महाआघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. यानुसार, १२ जून रोजी बैठक होणार होती. परंतु, ही बैठक तात्पुरती पुढे ढकलण्या आली. आता ही बैठक २३ जून रोजी होणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एम.के.स्टॅलिन, हेमंत सोरेन, अखिलेश यादव आणि डाव्या पक्षांचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. तर, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक या बैठकीला नसतील.