Waqf Bill : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. यानंतर या विधेयकाला विरोध देखील होताना दिसत आहे. यादरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विजय कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही मानले जाईल आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल असे म्हटले आहे. “वक्फ सुधारणेचे पालन न करण्याची धमकी देणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल. हा पाकिस्तान नाही, हा हिंदुस्थान आहे. हे नरेंद्र मोदी सरकार आहे,” असे सिन्हा म्हणाले आहेत.

“विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये योग्य पद्धतीने मंजूर झाले आहे. तरीही जे हे स्वीकारणार नाहीत ते देशद्रोही आहेत. अशा लोकांना ताबडतोब अटक केली पाहिजे.”

यादरम्यान जनता दल (युनायटेड) एमएलसी गुलाम गौस यांनी गुरूवारी या विधेयकावर टीका केली आहे. शुक्रवारी बोलताना ते म्हणाले की, जे खूनी आहेत तेच न्यायाधीश बनले आहेत, कोणाकडे न्याय मागावा (जो कातिल है वही मुन्सिफ है, किसे न्याय मांगे).” भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील जनता दल (युनायटेड) हा तिसरा सर्वात मोठा घटक पक्ष आहे ज्याने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

गौस यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे, ते म्हणाले की, “जर भाजपा खरोखरच मुस्लिमांच्या कल्याणाचा विचार करत असेल तर ते न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग आणि न्यायमूर्ती आर. सच्चर समितीच्या अहवालाच्या शिफारशी का लागू करत नाही?”

जदयूचे दुसरे एक नेते आणि माजी खासदार गुलाम रसूल बलियावी यांनी देखील या विधेयकाविरोधात त्यांचे आंदोलन सुरू केले आहेत. याबरोबरच ईस्ट चंपारण जिल्ह्यातील नेते मोहम्मद कासिम अन्सारी यांनी या मुद्द्यावर पक्षाला सोडचिठ्‍ठी दिली आहे .

जनता दल (युनायटेड)च्या एका वरिष्ठ मुस्लिम नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “या विधेयकाला पक्षाच्या पाठिंब्याबाबत नितीश कुमार यांना पूर्णपणे विश्वासात घेतले आहे की नाही याबद्दल मला खात्री नाही. आमच्या माहितीनुसार, पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी नितीश कुमार यांना यामधील वादग्रस्त भाग काढून टाकायचा होता. पण तसे झाले नाही.”