बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवारी होणार असून त्याच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. विकासाच्या कार्यक्रमाबाबतचा मुद्दा बाजूला ठेवून प्रतिस्पर्धी पक्षांनी एकमेकांवर आरक्षणाच्या मुद्दय़ावरूनच शरसंधान करण्याचा प्रयत्न केला.
विजयादशमीचा सण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी राज्याशी संबंधित नसलेल्या प्रश्नांवरून निवडणुकीच्या प्रचारांत एकमेकांना लक्ष्य केले.
नरेंद्र मोदी सरकार आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप महाआघाडीच्या नेत्यांनी केला तर मोदी यांनी त्याला, दलित जळीतकांड, व्ही. के. सिंह यांनी केलेले वक्तव्य आणि नितीशकुमार तांत्रिकाची भेट घेत असल्याची प्रसारित झालेली व्हिडीओ फीत, या प्रश्नांचा उल्लेख करून प्रत्युत्तर दिले.
जद(यू)चे आमदार सत्यदेवसिंह हे एका व्यापाऱ्याकडून खंडणी घेत असतानाची फीत प्रसारित झाल्याने मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी महाआघाडीवर जोरदार टीका केली. छप्रा, नालंदा आणि पाटणा येथे झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांची मानसिकता १८ व्या शतकातील असल्याची टीका केली. तांत्रिकाचा उल्लेख करून मोदी यांनी, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे राष्ट्रीय जादूटोणा पार्टीचे नेतृत्व करीत असल्याचा हल्ला चढविला.
राज्यातील एकूण २४३ जागांपैकी ५० मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यांतील मतदान होणार आहे. पाटणा, वैशाली, सरण, नालंदा, भोजपूर आणि बक्सर जिल्ह्य़ातील हे मतदारसंघ आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत ८१ मतदारसंघात मतदान पार पडले आहे.