बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्यात विक्रमी ५७ टक्क्यांवर मतदान झाले होते. गेल्या वेळच्या तुलनेत सहा टक्क्यांनी हे जास्त आहे. हे मतदान कुणाला कुणाला फायदेशीर याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीच्या दृष्टीने दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. १६ ऑक्टोबरला सहा जिल्ह्यातील ३२ जागांसाठी हे मतदान होत आहे. यातील २१ जागा सध्या महाआघाडीकडे आहेत. राज्यातील ज्येष्ठ मंत्री अवधेश प्रसाद कुशवा स्टींग ऑपरेशनमध्ये अडकल्याच्या आरोपाने विरोधकांना प्रचारात एक मुद्दा मिळाला. या टप्प्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची भिस्त माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यावर आहे. मांझी हे इमामगंज मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांच्याविरोधात भाग्य आजमावत आहेत. भाजपने मुख्यमंत्रीपदी कुणाचेही नाव घोषित केलेले नाही. मात्र, ज्या प्रमाणे हरयाणात अनेक दिग्गजांना मागे सारत मुख्यमंत्रीपदावर संघ प्रचारक राहिलेले मनोहरलाल खट्टर यांची निवड भाजप नेतृत्वाने केली होती. आता तशीच चर्चा बिहारमध्ये सुरु आहे. राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आलीच तर संघटन मंत्री असलेले राजेंद्र सिंह हे बिहारमधील ‘खट्टर’ होतील काय याचे उत्तर देण्यास मात्र कुणीच तयार नाही. अर्थात ४९ वर्षीय सिंह यांनीही याबाबतचे मौन बाळगले आहे. राज्याच्या राजकारणात ते यापूर्वी फारसे सक्रिय नव्हते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित असलेल्या सिंह यांचे सुरुवातीला कार्यक्षेत्र उत्तर प्रदेश हे होते. २०१३ मध्ये झारखंडमध्ये भाजपचे सरचिटणीस (संघटन मंत्री) म्हणून त्यांना पाठवण्यात आले. झारखंडमधून लोकसभेच्या भाजपने १२ जागा जिंकल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना बिहार निवडणुकीच्या तयारीसाठी नेमलेल्या चार सदस्यीस समितीत स्थान दिले. पाटणा-मगध विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आता दिनार मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या पहिल्याच यादीत त्यांचा समावेश होता. त्यामुळे सिंह यांच्याकडे भविष्यात मोठी जबाबदारी येईल याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांना आशा आहे.
मतदारांना प्रलोभन?
कोणतीही निवडणूक खर्चिक झाल्याचा सूर असतो. बिहारची निवडणूकही त्याला अपवाद नाही. आतापर्यंत जवळपास १७ कोटी १७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ८२७ किलो गांजा तसेच सोने व एक लाखावर लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगासह संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलल्याने अपप्रवृत्तांना काही प्रमाणात चाप बसला आहे. पहिला टप्प्यातही शांततेत मतदान झाले आहे. मात्र नेत्यांचे-आरोप प्रत्यारोप थांबायला तयार नाहीत. विकासाच्या मुद्दय़ावर प्रचार करु असे सांगणारे सारे नेते भावनिक मुद्दय़ावर भर देत आहेत. सामना चुरशीचा असल्याने त्यांना हाच मार्ग सोयीचा वाटतोय, असे दिसतंय. मतदार खूप हुशार आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
– ह्रषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा