Bihar Floor Test Updates : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना इंडिया आघाडीला सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत एनडीए सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि नितीश कुमार प्रणीत एनडीए सरकारने विश्वासप्रस्ताव जिंकला. विश्वासदर्शक ठरावावेळी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळे एनडीएने १२९ मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि १२५ मतांनी मंजूरही झाला. त्यानंतर चौधरी यांना अध्यक्षपद सोडावे लागले. यावेळी आरजेडीचे तीन आमदार नीलम देवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव हे एनडीए आघाडीच्या बाकावर जाऊन बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला चार मते अधिक पडल्याचे दिसले.

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका

बिहार विधानसभेतील कोणत्या पक्षाचे किती आमदार?

राष्ट्रीय जनता दल – ७९
भाजपा – ७८
जनता दल युनायटेड – ४५
काँग्रेस – १९
डावे पक्ष – १६
हिंदुस्तान अवाम मोर्चा – ४
अपक्ष – १

जदयूच्या आमदारांसाठी वाईट वाटतं – तेजस्वी यादव

विधानसभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मला जदयूच्या आमदारांसाठी वाईट वाटतं. ते आता पुढच्या निवडणुकीत जेव्हा जनतेसमोर जातील. तेव्हा त्यांना जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल. लोक म्हणतील नितीश कुमार यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होतात, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन का केले? दुसऱ्या बाजूला आम्ही जेव्हा जनतेमध्ये जाऊ तेव्हा १७ महिन्यांच्या काळात सरकारमध्ये काय काम केले, कसे रोजगार दिले, हे जनतेला सांगू.”

Story img Loader