उन्हाळ्यामुळे वाढता पारा आणि त्यातच आगीच्या घटनांमुळे बिहार सरकारने सकाळी नऊ ते सहा या वेळेत ग्रामीण भागात होमहवन करण्यावर तसेच अन्न शिजवण्यावर बंधने घातली आहेत. नागरिकांनी यावेळेत आगाशी संबंधित कोणतेही काम करू नये, असे निर्देशच राज्य सरकारच्या आपत्कालीन विभागाने जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या लखीसराई आणि दरभंगा जिल्ह्यांमध्ये आगीच्या घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटणा, नालंदा, भोजपूर, बक्सर, रोहतास, भाबुआ यासह अन्य जिल्ह्यांसाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी म्हटले आहे की उन्हाळा तीव्र आहे. त्यातच आगीच्या घटनाही वाढताहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे. सकाळी नऊपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांनी अन्न शिजवू नये. त्याचबरोबर होमहवनासारखे धार्मिक कार्यही करू नये. सकाळी नऊच्या आधीच धार्मिक कार्ये उरकून घेण्यात यावीत. त्याचबरोबर शेतामध्ये गव्हाच्या पिकाचा जो पालापाचोळा शिल्लक आहे. तो सुद्धा या वेळेत पेटवू नये, असे सूचनेत म्हटले आहे. रणरणत्या उन्हात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठीच हे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा