Bihar Hooch Tragedy News Update : विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूंचं तांडव निर्माण झालं आहे. दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांनी दृष्टी गमावली आहे. यामध्ये मृतांची संख्या वाढणार असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ लोकांना अटक केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर, बिहारमधील विरोधी पक्षांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मंगळवारी खेरवा परिसरात विषारी दारू प्राशन केल्याने आजूबाजूच्या गावातील लोकांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे पीडितांना सिवान, छप्रा आणि पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यत आले. तिथे अनेकांचा मृत्यू झाला. विषारी दारू प्यायल्याने ५० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक होती. मृतांचा आकडा सातत्यान वाढत जात असून अनेक रुग्णांची दृष्टी गेली आहे. तर, अनेकांना उलट्या आणि छातीत दुखत आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, खेरवा गावातील मुसहरी टोला येथील प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे. प्रत्येक घरातून एकाचा तरी मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. घरातील सदस्यांनी दारू प्यायल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी कबूल केलं.

हेही वाचा >> Crime News : Instagram रिल्स पोस्ट करण्यावरुन वाद झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या, कुठे घडली ही घटना?

२५ जणांची हत्या – तेजस्वी यादव

दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, विषारी दारू पिऊन २५ जणांची हत्या झाली आहे. डझनभर लोकांची दृष्टी गेली आहे. बिहारमध्ये कथित दारुबंदी आहे, पण सत्ताधारी नेते, पोलीस आणि माफियांच्या संगनमताने प्रत्येक चौकात दारू मिळते आहे.

याप्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून गेल्या २४ तासांत २५० छापे मारण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार ६५० लीट अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. सारणचे जिल्हा न्यायदंडाधिकारी अमन समीर म्हणाले, मृतांच्या कुटुबीयांनी राज्य सरकारच्या दारूबंदीला पाठिंबा दिला पाहिदे. जर पोस्टमार्टममध्ये विषारू दारू पिऊन मृत झाल्याचा अहवाल आला तर प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला आहे. उत्पादन, शुल्क आणि नोंदणी विभागाच्या सचिवांना सखोल चौकशीसाठी घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.