गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ११ लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीआरएफच्या ७ आणि एसडीआरएफच्या ९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
कर्नाटकमध्ये गंगावल्ली आणि काली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कन्नड जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. या भागात भारतीय तटरक्षक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत १०० हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. तर अंकोला तालुक्यात पूरसदृश्य स्थिती आहे. नदीकाठच्या १५ गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
#WATCH | In view of heavy rains, NDRF, Mundali (Odisha) assisted in carrying out relief work to the affected districts of Maharashtra, Goa & Karnataka in coordination with IAF, yesterday evening.
(Video Source: NDRF) pic.twitter.com/PqiffLg6f8
— ANI (@ANI) July 23, 2021
गोव्यातही पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. १ हजाराहून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे. तर हजारो लोकं बेघर झाली आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच पुराचा फटका बसलेल्या लोकांना तात्काळ मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त लोकांना राहण्यासाठी सरकारी शाळांमध्ये तात्पुरती सोय करण्यात आली आहे. तसेच खाणं-पिणं आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.