बिहारमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी जिवंत जाळलं. विवाहीत महिलेसोबत दुसरं लग्न केल्याने त्या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलं.
श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव आहे. ओरहलिया गावात राहणाऱ्या श्रवणचे काही वर्षांपूर्वी एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र, त्याचे गावातील एका दबंग कुटुंबातील सुनेसोबत प्रेमसंबंध होते. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून तिच्याशी पळून जावून लग्न केलं होतं. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबियांनी श्रवणविरोधात अपहरणाची तक्रार केली होती. पळून लग्न केल्यानंतर दोघे काही महिन्यांसाठी गावा बाहेरच राहिले. मात्र नोव्हेंबरमध्ये श्रवण त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत परतल्यानंतर दोघांनी गावाच्या पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. मात्र, पंचायतीच्या निर्णयाआधीच श्रवणच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करत जिवंत जाळले.यात 70 टक्के भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला. श्रवणचा भाऊ जीतन महतो याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पहिल्या पतीने सर्वप्रथम श्रवणला बांधून ठेवलं आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल टाकून त्याला आग लावण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी 14 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.