कर्नाटकच्या हुबळी येथे एका पाच वर्षांच्या चिमूरडीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. बिहारमधील स्थलांतरीत मजूर रितेश कुमारने (वय ३५) सदर गुन्हा केल्याचा आरोप होता. पोलिसांनी आरोपी रितेशला अटक करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी झटापट केल्यानंतर चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

हुबळी-धारवाड शहराचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी सांगितले की, रितेश कुमारला पोलीस अटक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या पायावर आणि पाठीत गोळी झाडली. त्यानंतर हुबळीच्या कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी रितेश कुमार मुळचा पटना, बिहारमधील असून मागच्या दोन-तीन महिन्यांपासून हुबळी येथे मजूर म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आरोपी रितेशने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत स्वतः बरोबर नेले. मुलीचे वडील रंगकाम करतात आणि आई घरकाम करते. आई ज्या घरात घरकाम करत होती, त्याठिकाणी ती मुलीला स्वतः बरोबर घेऊन गेली होती. याच घराच्या आवारात मुलगी खेळत असताना आरोपीने तिला पळवले.

मुलगी बेपत्ता असल्याचे आढळल्यानंतर आईने आरडाओरडा केला. स्थानिकांनीही मुलीचा शोध घेतला. जवळच अद्यापक नगरमधील एका निर्जन भागात मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी निदर्शने करत आरोपीला अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रितेश कुमार मुलीला नेत असल्याचे दिसत होते. सदर फुटेज व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट पसरली.