बिहारमधील पूर्व चंपारण गावात मुलींशी बोलल्याच्या कारणावरून चार अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर या मुलांचे मुंडण करून अर्धनग्न अवस्थेत त्यांची धिंडदेखील काढण्यात आली. या घटनेनंतर पिपरा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पूर्व चंपारण येथील हर्दियाबाघ गावातील १४ ते १६ वयोगटातील चार मुले बाखरी गावात आली होती. हे चौघे बाखरी गावातील एका अल्पवयीन मुलीशी गप्पा मारत होते. हर्दियाबाघमधील मुलांनी आपल्या गावातील मुलीशी गप्पा मारणे ग्रामस्थांना रुचले नाही व त्यांनी या चौघा मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. रात्रभर या चौघा मुलांना झाडाशी बांधूनही ठेवले होते. या चारही मुलांच्या पालकांनी मुले बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिस तपासात या चौघांना बाखरी गावातील ग्रामस्थांनी डांबून ठेवल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांचीही सुटका केली. मुलांना मारहाण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही गावातील ग्रामस्थांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. चौकशीनंतरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader