Bihar Crime News : एखादा चोर चोरी करताना पकडला गेला तर लोकांकडून त्याला जबर चोप मिळतो. त्यानंतर त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. मात्र बिहारमध्ये एका संशयित चोराला जमावाने चोप दिल्यानंतर त्याच्याबरोबर घृणास्पद कृत्य केलं आहे. तसेच ते किळसवाणं कृत्य करत असताना व्हिडीओ चित्रीत केला असून हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायल होत आहे. राष्ट्रीय जनता दलाने व त्यांच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ शेअर करत थेट राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं आहे.
या व्हिडीओत दिसतंय की काही लोकांनी एका तरुणाचे (पिवळा टी-शर्ट परिधान केलेला तरुण) हात बांधले आहेत, तसेच त्याला पकडून ठेवलं आहे, जेणेकरून तो पळून जाऊ नये. तेवढ्यात तरुणाच्या मागे उभा असलेला इसम म्हणाला, “ए विकास लाओ तो!” त्यानंतर एक तरुण लाल मिरची पावडर घेऊन आला. त्यानंतर त्या दोघांनी संशयित चोराची पँट उतरवून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकली. तसेच दुसरा इसम पेनाच्या मदतीने ती मिरची पावडर चोराच्या गुदद्वारात ढकलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी संशयित चोर जोरजोराने ओरडत होता.
बिहारमधील घटना
व्हिडीओमधील लोकांचं बोलणं स्पष्ट ऐकू येतंय. त्यानुसार हा संशयित बाइकचोर आहे. मात्र त्याला काही लोकांनी पकडलं. व्हिडीओमधील आवाजावरून समजतंय की हा व्हिडीओ बिहारमधील असावा. इंडियन एक्सप्रेसने पुष्टी केली आहे की हा व्हिडीओ बिहारच्या अरारिया येथील आहे.
“त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका”
एका किराणा मालाच्या दुकानाबाहेर हा सगळा प्रकार चालू होता. या व्हिडीओत काही जण बोलतायत, “व्हिडीओ चित्रित करा”, दुसरा एक इसम म्हणाला, “मी तेच करतोय”. आणखी एक इसम म्हणाला, “पोलिसांना बोलवा”. त्यावर आणखी एक इमस म्हणाला, “पोलिसांना बोलावून फायदा नाही. पोलीस याला इथून घेऊन जातील आणि मग सोडून देतील. त्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका”.
हे ही वाचा >> Female Doctor Attacked : केस ओढले, बेडवर डोकं आपटलं, महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
एक आरोपी अटकेत
दरम्यान, तिथे आणखी काही लोक जमा झाले. संपूर्ण व्हिडीओमध्ये सर्वजण एकसुरात चोर-चोर असं ओरडत आहेत. काही जण म्हणत आहेत की “याला इथेच कठोर शिक्षा द्या”. राष्ट्रीय जनता दलाने या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की ही “नितीश – भाजपा सरकारच्या काळातील गुंडगिरी. बिहारमध्ये जंगलराज चालू आहे. ही तालिबानपेक्षा वाईट स्थिती आहे. बिहारमध्ये दररोज शेकडो खून होत आहेत, मात्र मुख्यमंत्री जागे नाहीत”.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.