बिहारच्या मुझफ्फरनगरमधील नितिशेश्वर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने आपला संपूर्ण पगार परत केला आहे. ललन कुमार सप्टेंबर २०१९ मध्ये महाविद्यालयात रुजू झाले होते. पण ३३ महिन्यात एकही विद्यार्थी वर्गात आला नाही. यामुळे लालन कुमार यांनी ३३ महिन्यांमध्ये मिळालेला पगार म्हणजेच तब्बल २४ लाख रुपये परत केला आहे. अजिबात न शिकवता हा पगार घेणं माझ्या तत्वांच्या विरोधात असल्याचं सांगत लालन कुमार यांनी पगार परत केला आहे.
३३ वर्षीय लालन कुमार यांनी २३ लाख ८२ हजार २२८ रुपयांचा धनादेश बी आर आंबेडकर बिहार विद्यापीठात जमा केला आहे. महाविद्यालय बी आर आंबेडकर बिहार विद्यापीठ या राज्य विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आहे.
“माझा विवेक मला कोणतीही शिकवणी न देता पगार घेण्याची परवानगी देत नाही,” असं लालन कुमार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “ऑनलाइन शिकवणी घेत असतानाही काही मोजके विद्यार्थी उपस्थित असायचे. जर मी इतकी वर्ष काही न शिकवता पगार घेतला तर हे माझ्यासाठी शैक्षणिक मृत्यू झाल्यासारखं आहे”.
दरम्यान कॉलजचे मुख्याध्यापक मनोज कुमार यांनी लालन कुमार यांनी पगार परत केल्याने त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. “फक्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हे कारण नसून पदव्युत्तर विभागात बदली मिळवण्यासाठीचं दबावतंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान बी आर आंबेडकर बिहार विद्यापीठाचे रजिस्ट्रार आर के ठाकूर यांनी मात्र लालन कुमार यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, “लालन कुमार यांनी जे केलं आहे ते असामान्य असून आम्हा सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आम्ही कुलगुरूंशी चर्चा करत आहोत आणि लवकरच नितिशेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना गैरहजेरीबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगू”, असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.
लालन कुमार यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून पीएचडी आणि एमफिल पूर्ण केलं आहे. त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर विभागात बदलीसाठी अर्जदेखीील केला होता.
लालन कुमार यांची ही पहिलीच नोकरी होती. महाविद्यालयात अजिबात शैक्षणिक वातावरण दिसत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. “मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि २ वर्ष ९ महिन्यांचा पगार परत केला,” असं त्यांनी सांगितलं आहे.