ओडिशाच्या किनारपट्टीला ताशी २२० किमी वेगाने येऊन धडकलेल्या पायलिन चक्रीवादळाचा वेग आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, हे वादळ आता बिहारच्या दिशेने पुढे सरकले असून बिहारला पुराचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.
घोंघावत आलेल्या वादळाच्या तडाख्याने ओडिशात मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली आहे. राज्यातील लाखो घरे भुईसपाट झाली असून संदेशवहन, रेल्वे व रस्ते वाहतूक कोलमडली आहे. विशेष करून गंजम जिल्ह्य़ाला जास्त फटका बसला आहे. भुवनेश्वर येथे अनेक घरे कोसळली, झाडे कोसळली, गोपाळपूर पासून जवळ असलेल्या पारमपूर येथेही मोठे नुकसान झाले.  पुरी, बालासोर, जगतसिंगपूर, कटक, संबळपूर येथे वादळामुळे जोरदार पाऊस झाला.
 वादळाची तीव्रता आज सकाळी कमी झाली व ते उत्तरेकडे गेले, नंतर ते सायंकाळी कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतरित होईल. आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. बिहारमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला असून तिथे मोठय़ा प्रमाणावर पावसाची शक्यता आहे.