अविवाहीत मुलींनी मोबाईल फोनचा वापर करू नये असा अजब फतवा बिहारमधील एका ग्रामपंचायतीने काढला आहे. यानुसार एखाद्या अविवाहीत मुलीने मोबाईल फोन वापरल्यास तिच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असा नियम करण्यात आला आहे.
मुख्यम्हणजे फतव्या काढण्यात आलेल्या गावात महिला सरपंच आहे. परंतु, पंचायतीचा सर्व कारभार या महिला सरपंचाचे पती झाकीर अन्सारी पाहतात. ते म्हणाले की, “गावकऱयांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी गावातील प्रत्येक कुटुंबाने घ्यावी.”
बिहारमधील सोमगड पंचायतीच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा अधिकार पंचायतीला नाही असे बिहारचे पंचायत मंत्री भीमसिंह यांनी स्पष्ट केले आहे. पंचायतीच्या या निर्णयाविरुद्ध त्या गावातील कुणीही तक्रार दाखल केली, तर सरकार पंचायतीविरुद्ध कारवाई करेल असेही भीमसिंह यांनी सांगितले