बिहार पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला आहे. या प्रकरणी पाटण्यात केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांच्या कटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचाही समावेश होता, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. आरोपींपैकी एकजण माजी पोलीस अधिकारी असल्याचं समोर आलंय. या कटानुसार भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांचं १५ दिवसांचं प्रशिक्षण फुलवारी शरिफ येथे झालं. त्यांनी ६ व ७ जुलैला घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींवर १२ जुलैच्या दौऱ्यात हल्ला करण्याचा कट रचला. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून काही कागदपत्रे मिळाली. यात ‘२०४७ पर्यंत भारत एक इस्लामिक राष्ट्र’ नावाचे कागदपत्र सापडले. याशिवाय २५ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (PFI) पॅम्प्लेटही हस्तगत करण्यात आले.
पीएफआयने कटाचे पॅम्प्लेट प्रकाशित केल्याचे आरोप फेटाळले
दुसरीकडे पीएफआयने मात्र पोलिसांनी जप्त केल्याप्रमाणे कोणतीही पॅम्प्लेट प्रकाशित केले नसल्याचं म्हटलंय. तसेच हे आरोप फेटाळून लावले आहेत.
संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तान, बांगलादेशव तुर्कीमधून पैशांचा पुरवठा
फुलवारी शरिफ येथे भेट देणाऱ्या आणि दहशतवादी हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये बहुसंख्य युवक उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथून आल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तान, बांगलादेशव तुर्की सारख्या मुस्लीम देशांमधून पैसे मिळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : “श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्थिती होईल”
संशयित दहशतवाद्यांमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याचा समावेश
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, अटक केलेल्या आरोपींपैकी एकजण माजी पोलीस अधिकारी आहे. आरोपी मोहम्मद जलालुद्दीन झारखंड पोलीस विभागातील माजी अधिकारी आहे. या आरोपींचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या कट्टरतावादी संघटनेशी संबंध आहे. जलालुद्दीन याआधी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या कट्टरतावादी संघटनेशीही संबंध राहिला आहे. फुलवारी शरिफचे साहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कुमार यांनी याबाबत माहिती दिली.