Bihar Police : बिहारमधील बेतिया शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्या सहकारी पोलीस कॉन्स्टेबलची तब्बल ११ गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारमध्ये आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
बिहारच्या बेतियामधील पोलीस दलाच्या लाईनमध्ये शनिवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने त्याच्याच सहकाऱ्यावर गोळीबार केला आहे. दरम्यान, तो आणि त्याचा सहकारी यांच्यात काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
माहितीनुसार, आरोपी सरबजीतने त्याच्या रायफलमधून सुमारे एक डझन राउंड फायर केले. त्यात सोनूचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. मात्र, आरोपी बॅरेकच्या छतावर गेल्यामुळे त्याला लगेचच ताब्यात घेता आलं नाही. त्यानंतर काही वेळाने कॉन्स्टेबल सरबजीतला अटक करण्यात आली. तसेच त्याने कॉन्स्टेबल सोनूला गोळ्या घालण्यासाठी वापरलेली रायफलही जप्त करण्यात आली आहे.
बेतिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, गोळीबाराची घटना दोन कॉन्स्टेबलमधील वैयक्तिक वादामुळे घडली. जे एकमेकांचे चांगले मित्रही होते अशी माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, चौकशी दरम्यान असं आढळून आलं की दोघेही एकमेकांच्या कुटुंबांना ओळखत होते आणि ते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना वारंवार उपस्थित राहत होते. सोनू कुमारचा सरबजीतच्या पत्नीशी होत असलेल्या संवादांमुळे सरबजीत अस्वस्थ झाला होता.
दरम्यान, चौकशी सरबजीतने सांगितलं की त्याने सोनूला त्याच्या पत्नीशी बोलण्यास आक्षेप घेतला होता. तसेच याबाबत सरबजीतने सोनूला आधीच इशारा दिला होता. परंतु तरीही तो ऐकत नसल्याने यावरून शुक्रवारी रात्री जोरदार वाद झाला, त्या वादातून गोळीबार केला, अशी माहिती चौकशी केल्यानंतर समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तसेच या घटनेचा तपास सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.