संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातच वेगवेगळ्या संस्थांकडून केल्या जाणाऱ्या मतदानपूर्व चाचण्यांच्या निकालांमध्ये मोठा फरक पाहायला मिळत असल्याने उत्सुकता आणखीनच वाढली आहे. सीएनएन-आयबीएन आणि अॅक्सिस यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीला २४३ पैकी १२९ ते १४५ जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी सीएसडीएस-इंडियन एक्स्प्रेस यांनी केलेल्या सर्वेक्षणात बिहारमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेमध्ये नितीशकुमार-लालूप्रसाद यांच्या आघाडीला ४६ टक्के मते पडण्याची शक्यता सीएनएन-आयबीएनने वर्तविली आहे. या सर्वेक्षणात भाजप आघाडीला अवघ्या ८७ ते १०३ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूण १०० जागा लढवत असलेल्या जनता दल युनायटेडला ६४ ते ७४ जागा मिळण्याची शक्यता असून, ४० जागांवर उमेदवार उभे केलेल्या काँग्रेसला २० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नव्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये नितीश-लालूंच्या आघाडीला स्पष्ट बहुमताची शक्यता
महाआघाडीला २४३ पैकी १२९ ते १४५ जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 09-10-2015 at 14:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar pre poll survey predicts big win for nitish lalu alliance