पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये पददलितांचे सक्षमीकरण करून त्यांचा सर्व बाजूंनी विकास करण्यात आम्ही कमी पडलो, या चुकांमधून आम्ही धडा शिकलो आहोत अशी कबुली पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिली. पाटण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या संविधान सुरक्षा संमेलन या परिसंवादामध्ये ते बोलत होते. पददलितांच्या विकासाला आम्ही आता सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत असल्याने राहुल यांचा गेल्या चार महिन्यांमधील हा तिसरा बिहार दौरा आहे. राज्यातील आमचे राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांबरोबरचे महागठबंधन सत्ताधारी रालोआला लढत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या चुकांबद्दल ते म्हणाले की, ‘‘बिहारमध्ये ज्या उत्साहाने काम करायला हवे होते ते आम्ही केले नाही हे मान्य करणारी काँग्रेसमधील मी पहिली व्यक्ती असेन. पण आपण आपल्या चुकांमधून शिकत पुढे जायला हवे. अनुसूचित जाती व जमाती, ओबीसी, अति मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आमचा पक्ष आणि आमची आघाडी काम करेल.’’ बिहारमध्ये १९९०च्या दशकात मंडल राजकारणाने पकड घेतल्यानंतर तेथील काँग्रेसचा जनाधार झपाट्याने घटला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी अशी यंत्रणा तयार केली आहे, त्यामध्ये देशाच्या पाच टक्के लोकसंख्येच्या हाती सर्व कारभार आहे आणि केवळ १० ते १५ लोक संपूर्ण कॉर्पोरेट जगतावर नियंत्रण ठेवत आहेत.
यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा देशभरात जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा जनगणनेला विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली.