बिहारमधील जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. मात्र, याचा अर्थ विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनाचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न करावा, असा होत नाही, असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी स्पष्ट केले. संसदेचे हिवाळी येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या तारखा आणि कालावधी निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्रिगटाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांना वेळीच सावध करण्याचे काम केले.
ते म्हणाले, इतर राज्यांप्रमाणेच बिहारमधील जनतेलाही विकासच हवा आहे. त्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. देशाचा विकास वेगाने होण्यासाठी पोषक वातावरणही हवे. त्यासाठीच आर्थिक सुधारणा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे बिहार निवडणुकीचा कोणीही सोयीस्कर अर्थ लावू नये. संसदेमध्ये आर्थिक सुधारणांना गती देणारी विधेयके मंजूर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली पाहिजे. बिहारमधील निवडणुकीचा अर्थ संसदेचे कामकाज रोखण्याची संधी असा लावू नये, असे त्यांनी सांगितले.
२६ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader