जम्मू काश्मीरच्या बंदीपोरामध्ये स्थलांतरित कामगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारानंतर कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कामगाराची ओळख पटली असून मोहम्मद अमरेज असं त्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी होता.
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदीपोरा येथे दहशतवाद्यांनी मध्यरात्री गोळीबार करत बिहारमधील स्थलांतरित कामगार मोहम्मद अमरेज याला जखमी केलं होतं. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी खोऱ्यातील स्थलांतरितांना टार्गेट करत आहेत. २ जूनला दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये राजस्थानच्या एका बँक मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. तसंच याआधी बिहारमधील स्थलांतरित कामगार १७ वर्षीय दिलखुश कुमार याची हत्या करण्यात आली होती. मे महिन्यात कुलगाम जिल्ह्यात एका हिंदू शिक्षकाला गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं.