Case against Rahul Gandhi for Rs 250 compensation : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका तरुणाने एक विचित्र गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करताना तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, राहुल गांधी यांचे भारतातील राज्याविरुद्ध लढण्याबद्दलचे विधान ऐकून त्याला धक्का बसला. यामुळे, दुधाने भरलेली बादली त्याच्या हातातून निसटली आणि त्यातील ५ लिटर दूध खाली पडले. यामुळे त्याचे ५० रुपये प्रति लिटर भावाप्रमाणे एकूण २५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराचे नाव मुकेश चौधरी आहे. तो रोसराच्या सोनुपूर गावचा रहिवासी आहे. मुकेश याने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करून राहुल गांधींवर देशद्रोहाशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलम १५२ अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली. काँग्रेस खासदार राहुल गांधी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहेत. त्याचबरोबर देशातील ‘राज्याबरोबर लढत आहोत’ हे राहुल गांधी यांचे विधान ऐकून त्यांना धक्का बसल्याचा दावा या तरुणाने आपल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान या तरुणाची ही याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे की नाही याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
१५ जानेवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर भाजपाने जोरदार टीका केली होती.
या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत. असे समजू नका की भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. आता आपण भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय राज्याशीही लढत आहोत.”
भाजपाकडून टीका
राहुल गांधी यांनी कलेल्या या विधानाला त्याच दिवशी, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय जे.पी. नड्डा यांनी एक्सवर पोस्ट करत उत्तर दिले होते. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “देशाला जे माहित आहे, ते स्पष्टपणे सांगितले त्यासाठी मी राहुल गांधी यांचे कौतुक करतो. त्यांनी मान्य केले की, ते भारतीयांशीच लढत आहेत. हे गुपित नाही की, राहुल गांधी आणि त्यांच्या लोकांचे शहरी नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध आहेत.”