गुन्हेगारी विश्वात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वयाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती. तसेच शोभराजवर भारतासह थायलंड आणि तुर्कीमधील २० पेक्षा जास्त महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – दिल्ली परिसरात धुक्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत

नेपाळमध्ये झाली होती अटक

शोभराजने १९७५ मध्ये कोनी जो बोरोन्झिच आणि लॉरेंट कॅरियर या दोन अमेरिकी पर्यटकांची नेपाळमध्ये हत्या केली होती. त्यानंतर तो नेपाळमधून फरार झाला. २००३ त्याने बनावट पासपोर्टच्या आधारे पुन्हा नेपाळमध्ये प्रवेश केला. २००३ मध्ये शोभराज नेपाळमधील एका कॅसिनोबाहेर दिसून आला होता. त्यानंतर काठमांडू पोलिसांनी त्याला अटक केली. अमेरिकी पर्यटकांची हत्येच्या आरोपाखील त्याला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने २१ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा – काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीच्या ‘चिल्लई कलान’ हंगामास सुरुवात

कोण आहे चार्ल्स शोभराज?

‘द सर्पंट’ व ‘बिकिनी किलर’ या सारख्या नावाने कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय आणि आई व्हिएतनामी होती. चार्ल्स भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून नशेची औषधं द्यायचा. यानंतर त्यांच्यासोबत प्रेमसंबंध बनवून त्यांची हत्या करायचा. शोभराजला १९७६ मध्ये भारतातही अटक करण्यात आली होती. तसेच त्याला सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, तो १९८६ मध्ये तिहार तुरुगांतून पळाला.