भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही देशांसाठी युद्ध परवडणारे नाही, अशा भावना दोन्ही देशातील नागरिक व्यक्त करताना दिसत आहे. युद्धामुळे दोन्ही देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रतिक्रिया भारतानंतर आता पाकिस्तानमध्येसुद्धा उमटताना दिसू लागल्या आहेत. पाकिस्तानच्या माजी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान या देशांना युद्ध परवडणारे नसल्याचे म्हटले आहे.
दोन्ही देश प्रिय असल्याचे सांगत बिलावल भुत्तो यांनी युद्धजन्य परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही देशांना शांतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये जगण्यासाठी अन्न नसल्यामुळे कचऱ्याचा शोध घेणाऱ्या बालकाच्या माध्यमातून त्यांनी जीवनाचा संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. युद्धानंतरचे हे चित्र दोन्ही देशांसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.
यापूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने युद्धानंतरची भिती व्यक्त केली होती. पाकिस्तान हा शांती प्रिय देश आहे. आम्हाला सर्वच देशांसोबत सहकार्याचे संबंध हवे असून युद्ध झाल्यास दोन्ही देशांना याचा फटका बसेल असे आफ्रिदीने म्हटले होते. चर्चेद्वारे प्रश्न सुटणार असेल तर कठोर पावले का उचलावीत असा सवालही त्याने उपस्थित केला होता.
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरुन भारत पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे भारताने वारंवार सांगितले आहे. उरी येथील लष्करी तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर मागील आठवड्यात भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये तब्बल ३८ अतिरेकी ठार झाले होते. नियंत्रण रेषे पलीकडे सुमारे एक ते तीन किलोमीटरच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली होती.
Dear Pakistan & India. This is what war looks like. https://t.co/azKhzKSpy3
— BilawalBhuttoZardari (@BBhuttoZardari) October 5, 2016