पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी हे वयोमानानुसार निवडणूक लढविण्यास पात्र झाले असून ते सिंध प्रांतातून पार्लमेंटची निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंध प्रांत हा भुत्तो कुटुंबीयांचा पारंपरिक बालेकिल्ला आहे.
लारकाना हे भुत्तो कुटुंबीयांच्या वास्तव्याचे शहर असून तेथून बिलावल भुत्तो हे राष्ट्रीय असेंब्लीची निवडणूक पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या तिकिटावर लढविणार आहेत. बिलावल भुत्तो यांना लारकाना मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीतून बिलावल हे सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
पीपीपीच्या कार्यकारी समितीने बिलावल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. बिलावल यांचे वडील आणि माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी गुरुवारी लारकानाजवळच्या नौदेरो येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेत बिलावल भुत्तो झरदारी मोकळेपणे जनतेत मिसळताना पाहावयास मिळाले. पीपीपीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी पार पडली. बिलावल भुत्तो यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या मतदारसंघातून निवडून आलेले माजी मंत्री अयाझ सुमरू यांच्यावर सिंध सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.