बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामुळे देशभरातून समाधानाच्या प्रतिक्रिया येत आहेत. या खटल्यातील ११ गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. तसेच, या सर्व गुन्हेगारांना पुन्हा एकदा कारागृहात शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आता हे गुन्हेगार त्यांच्या गावी, त्यांच्या घरी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे त्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
काय आला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामुहिक बलात्काराची क्रूर घटना घडली. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालला. ११ गुन्हेगारांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. मात्र, २०२२ मध्ये यातील एका आरोपीने केलेल्या विनंती अर्जाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय गुजरात सरकारने घेण्याचे निर्देश दिले. गुजरात सरकारने या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची सुटका झाली.
या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सोमवारी न्यायालयाने या सुनावणीवर अंतिम निकाल देताना ही शिक्षामाफी रद्द ठरवली. तसेच, यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा गुजरात सरकारचा नसून महाराष्ट्र सरकारचा असल्याची बाब अधोरेखित केली. या गुन्हेगारांना दोन दिवसांत पोलिसांत शरण येण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र, आता हे गुन्हेगार त्यांच्या घरी नसल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृ्त दिलं आहे.
गुजरातमधील रंधीकपूर आणि सिंगवेद या दोन गावांमध्ये ११ गुन्हेगारांपैकी ९ गुन्हेगार राहतात. पण आता हे गुन्हेगार त्यांच्या घरी नसल्याचं या वृत्तात नमूद केलं आहे. यापैकी ५५ वर्षीय गोविंद नाय हा गुन्हेगार आठवड्याभरापूर्वीच घर सोडून गेल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आणखी एक गुन्हेगार राधेश्याम शाह गेल्या १५ महिन्यांपासून घरीच आला नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. मात्र, आसपासच्या लोकांनी तो रविवारपर्यंत (निकालाच्या एक दिवस आधी) बाजारात दिसत होता, असा दावा केला आहे. त्याच्यासोबतच या प्रकरणातील इतर गुन्हेगारही दिसल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
“आता ते तुम्हाला सापडणार नाहीत”
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीने गावातल्या एका दुकानदाराला हे सर्व गुन्हेगार कुठे आहेत? अशी विचारणा केली असता “आता तुम्हाला ते सापडणार नाहीत. ते सगळे त्यांच्या घरांना कुलूप लावून इथून निघून गेले आहेत”, अशी माहिती त्यानं दिली. यातल्या प्रत्येक गुन्हेगाराच्या बंद घराच्या बाहेर आता एकेक पोलीस कॉन्स्टेबल तैनात ठेवण्यात आला आहे. “आम्ही तिथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कारण आम्हाला कोणताही अनुचित प्रकार तिथे होऊ नये याची काळजी घ्यायची आहे”, अशी प्रतिक्रिया रंधीकपूरचेच पोलीस उपनिरीक्षक जी. बी. रथवा यांनी दिली आहे.
दरम्यान, हे सर्व गुन्हेगार त्यांच्या पॅरोल किंवा फरलोच्या काळातही गावात आले होते, मात्र तेव्हाही ते पळून गेले नाहीत. त्यामुळे आताही ते पळून जाणार नाहीत, ते गावात त्यांच्या घरी परततील, असा विश्वास काही गावकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच, काही गुन्हेगार त्यांच्या कुटुंबीयांसमवेत इतर ठिकाणी राहाण्यास गेल्याचंही गावकऱ्यांनी सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.