Microsoft Employee Protest: इस्रायलने गाझापट्टीतील हमास संघटनेविरुद्ध युद्ध पुकारून दोन वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही अद्याप या प्रदेशात शांतता प्रस्थापित झालेली नाही. या संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. यानंतर पाश्चिमात्य देशांतून अनेक पॅलेस्टाईन समर्थकांनी युद्धाच्या विरोधात आवाज उचलला आहे. नुकतेच मायक्रोसॉफ्टच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्तही पॅलेस्टाईन समर्थकांनी निषेध नोंदविला. गाझातील संघर्षासाठी इस्रायलच्या लष्कराला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरविल्याबद्दल पॅलेस्टाईन समर्थकांनी मायक्रोसॉफ्टच्या विरोधात घोषणाबाजी केली.

मायक्रोसॉफ्टच्या एआय विभागाचे प्रमुख मुस्तफा सुलेमान कंपनीच्या एआय उत्पादन आणि कंपनीच्या भविष्यातील धोरणांचे सादरीकरण करत असताना पॅलेस्टाईन समर्थकाने घोषणाबाजी केली. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि माजी सीईओ स्टिव्ह बाल्मेर हेदेखील उपस्थित होते, असे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.

निषेध करणाऱ्या कर्मचारी महिलेचे नाव इब्तिहाल अबूसद असल्याचे कळते. सुलेमान भाषण करत असताना इब्तिहाल अबूसदने ‘मुस्तफा, शेम ऑन यू’ असे म्हणत त्यांचा निषेध केला. सदर घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) चांगल्या कामासाठी वापर केला जाईल, असे तुम्ही सांगितले. पण मायक्रोसॉफ्टने इस्रायलच्या लष्कराला एआय हत्यारे विकली. या संघर्षात ५० हजार लोकांचा बळी गेला. मायक्रोसॉफ्ट आपल्या प्रांतातील नरसंहाराला शक्ती पुरवत आहे”, असा थेट आरोप इब्तिहाल अबूसदने केला.

एआयचा नरसंहारासाठी वापर करू नका, असे ती वारंवार ओरडत होती.

मुस्तफा सुलेमान काय म्हणाले?

इब्तिहाल अबूसदच्या निषेधामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. घोषणाबाजी झाल्यानंतर मुस्तफा सुलेमान यांनी अबूसदला उद्देशून म्हटले, “तुझा निषेध माझ्यापर्यंत पोहोचला. मी तुझे म्हणणे ऐकून घेतले आहे.” सुलेमान यांच्या प्रतिक्रियेनंतरही इब्तिहाल अबूसद घोषणा देत होती. तिने म्हटले की, मायक्रोसॉफ्टचे हात रक्ताने माखलेले आहेत. कार्यक्रमातून तिला बाहेर काढले जात असताना तिने स्टेजवर आपला स्कार्फ काढून फेकला.