माणसांच्या कामांचे तास किती असावेत? यावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की तीन दिवसांचा आठवडा असला तरीही ठीक आहे. तसंच एआयबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. AI मुळे तुमची नोकरी जाईल असं नाही मात्र यामुळे गोष्टी बदलतील इतकं नक्की असंही बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे?

बिल गेट्स म्हणाले तीन दिवसांचा आठवडा असेल तरीही काही हरकत नाही. एका पॉडकास्टमध्ये बिल गेट्स यांनी हे भाष्य केलं आहे. नोकऱ्यांमध्ये AI सारखं कृत्रीम तंत्रज्ञान येतं आहे त्याविषयी काय सांगाल? असं विचारलं असता बिल गेट्स म्हणाले एक दिवस असाही येऊ शकतो की खूप मेहनत करावी लागणार नाही. आपल्या जगतात अशी एक वेळ येऊ शकते की आठवड्यातले तीन दिवसच काम केलं तरीही चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी ७० तास काम केलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता बिल गेट्स यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

एक असंही जग असू शकतं जिथे मशीन द्वारे जेवण तयार केलं जाईल, जीवनावश्यक वस्तू तयार केला जातील आणि लोकांना आठवड्यात पाच दिवसांऐवजी फक्त तीन दिवस काम करावं लागेल. एआयबाबत बिल गेट्स म्हणाले की याचा प्रभाव नक्कीच मोठा पडणार आहे. मात्र माणसांचं काम AI संपवणार नाही. कामच्या पद्धतींमध्ये बदल किंवा ज्याला फरक म्हणता येतील असे होतील, असंही बिल गेट्स म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. लोकांना कमी कालावधीसाठी काम करु देण्यास हरकत नसलेले बिल गेट्स हे एकमेव व्यावसायिक नाहीत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही साडेतीन दिवसांचा आठवडा आणि बाकी सुट्ट्या असतील असं एक वक्तव्य केलं होतं.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले होतं. पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले होती की भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिलं होतं तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला होता. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याची आठवण झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill gates believes a 3 day work week is possible foresees a future with more leisure time for humans scj