Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील Unified Payment Interface (UPI) प्रणालीचं कौतुक केलं आहे. हे खास तंत्रज्ञान गेम चेंजर ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. एक्स्प्रेस अड्डा या इंडियन एक्स्प्रेसच्या विशेष कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी या प्रणालीचं कौतुक केलं आहे.
UPI गेमचेंजर ठरेल असं माझं मत-गेट्स
बिल गेट्स यांनी आज इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्याशी एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतातील UPI चं कौतुक केलं आहे. बिल गेट्स म्हणाले, “भारतातील UPI ची प्रणाली मला फारच आवडली आहे. मला खात्री आहे हे गेमचेंजर आहे आणि जगाला सहकार्य करणारी प्रणाली ठरु शकते असं मला वाटतं.” भारताच्या वैश्विक महत्त्वाबाबतही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केलं. “जगभरात मी एकापेक्षा एक सरस भारतीयांना भेटलो आहे. तरीही अनेक लोक असेही आहेत ज्यांना या देशाबाबत फारशी माहिती नाही. त्यांनी भारतात आलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. असं घडल्यास ते अनेक महत्वाच्या गोष्टी शिकू शकतील, असं मला वाटतं.”
भारताबाबत काय म्हणाले बिल गेट्स?
जागतिक स्तरावर भारत हा विकसनशील देश आहे. २०४७ पर्यंत भारत जी प्रगती साधेल ती एकट्या भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारतात लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडते, तसंच येथील सरकार लोकांच्या प्राथमिकता ओळखून काम करतं आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासाठी सर्वाधिक निधी खर्च करण्यात येतो आहे. ही चांगली बाब आहे असं मला मनापासून वाटतं असंही बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
बिल गेट्स तीन वर्षांत तिसऱ्यांदा भारताच्या दौऱ्यावर
बिल गेट्स हे मागील तीन वर्षांत तिसऱ्यांदा भारताच्या दौऱ्यावर आहेत. एक्स्प्रेस अड्डा मध्ये त्यांनी सोर्स कोड माय बिगनिंग्जवरही चर्चा केली. या पुस्तकात त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, तसंच नव्या कल्पना यावर भाष्य आहे. त्याबाबतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली. बिल गेट्स यांनी AI बाबतही भाष्य केलं. हेल्थकेअर अर्थात आरोग्यविषयक क्षेत्रात AI ची मदत महत्त्वाची ठरेल असं मत बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्गम भागातील रुग्णांना एआयच्या मदतीने सहकार्य करता येईल असं गेट्स यांनी म्हटलं आहे. बिल गेट्स म्हणाले की तंत्रज्ञान क्षेत्रात सध्याच्या घडीला बरीच स्पर्धा आहे हे देखील त्यांनी मान्य केलं. तसंच AI सारख्या गोष्टींकडे सकारात्मक रित्या पाहुया असंही ते म्हणाले.