कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा शोध घेणारे चित्रण दाखवणाऱ्या झीरो डार्क थर्टी या हॉलीवूड चित्रपटातील छळवणूक ही पूर्णपणे कल्पनेवर आधारित असून अमेरिकी लष्कराने प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही छळवणूक केलेली नाही, असे स्पष्टीकरण सीआयएचे माजी अधिकारी जोश रॉड्रिग्ज यांनी दिले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट दैनिकात लिहिलेल्या लेखात रॉड्रिग्ज यांनी म्हटले की, लादेनचा शोध घेण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली २००२ ते २००७ या काळात शोध मोहिमांदरम्यान कुणाचाही छळ करण्यात आलेला नाही. मात्र चित्रपटामध्ये अशा प्रकारची दृश्ये घुसवण्यात आली आहेत.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने लादेनला शोधण्यासाठी जगभरात जोरदार मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानातील अबोट्टाबाद येथे मे २०११ मध्ये अमेरिकेच्या जवानांनी गुप्त कारवाई करून लादेनचा खातमा केला होता. या संपूर्ण घडामोडींवर आधारित झीरो डार्क थर्टी हा चित्रपट कॅथरिन बिगेलो या अकॅडमी पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने बनवला आहे.
मात्र चित्रपटात दाखविण्यात आलेली छळवणुकीची दृश्ये पूर्णपणे काल्पनिक आहेत. अशा प्रकारचा कोणताही छळ अमेरिकी लष्कराने केलेला नाही. एखाद्या व्यक्तीची चौकशी करताना त्याच्याकडून खूप महत्त्वाची माहिती काढायची असेल आणि तो प्रतिसाद देत नाही, तेव्हा थेट वॉशिंग्टनहून त्याबाबतची परवानगी मिळवावी लागते. चौकशीदरम्यान मारण्याचा कोणताही अधिकार नसून त्याबाबत कडक कायदे आहेत. त्यामुळे चित्रपटात दाखवले गेलेली दृश्ये एकदम काल्पनिक असल्याचे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.
सीआयएचे विद्यमान प्रमुख मायकेल मोरेल आणि इतर वरिष्ठांनीदेखील चित्रपटातील दृश्ये काल्पनिक आणि भडकपणे रंगवण्यात आल्याचे म्हटले आहे.

Story img Loader